Saturday, January 3, 2009

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या 52 व्या वार्षिक सर्वसाधारण sabha

साखर उद्योगासाठी लवकरच नवे धोरण : मुख्यमंत्री

- नव्या धोरणाबाबत 12 तारखेला पुण्यात बैठक


---------------------------------
राजकीय नुकसान सोसू, पण
सहकार क्षेत्राला शिस्त लावू!
""अधिक भाव देणाऱ्या कारखान्यांना ऊस देण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. राज्य सहकारी बॅंकेनेदेखील कारखान्यांच्या कर्जवसुलीकडे लक्ष द्यावे. सहकारी क्षेत्राला शिस्त लावण्यासाठी कटू निर्णय घ्यावे लागले तरी चालतील. त्यासाठी राजकीय नुकसान सोसू, परंतु सहकाराला शिस्त लावू,'' असे श्री. चव्हाण म्हणाले.
-------------------------

मुंबई (प्रतिनिधी) ः "" साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवे धोरण जाहीर करणार आहे,'' असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी येथे सांगितले. ""सहकारी कारखानदारीतील अपप्रवृत्तींना थांबवण्यासाठी कटू निर्णय घ्यावे लागतील. स्पर्धेत टिकण्यासाठी व्यावसायिकता अंगीकारण्याची गरज आहे. त्यासाठी साखर कारखाने काही प्रमाणात नियंत्रणमुक्त करण्याची आवश्‍यकता आहे,'' असेही श्री. चव्हाण म्हणाले.

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या 52 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्‌घाटन प्रसंगी श्री. चव्हाण बोलत होते. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, जलसंपदामंत्री अजित पवार, ग्रामविकास व पर्यटनमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, राज्य सहकारी बॅंकेचे अध्यक्ष माणिकराव पाटील, सहकार सचिव डॉ. सुधीर गोयल, साखर आयुक्त राजगोपाल देवरा, साखर संघाचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब पाटील, शिवाजीराव पाटील, शंकरराव कोल्हे, तसेच सर्व सदस्य कारखान्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, ""शासनाच्या वतीने इतर पिकांना मदत देताना नेहमीच उसाशी तुलना केली जाते, त्यामुळे साखर कारखानदारीला शासनाकडून दिलेल्या झुकत्या मापाला आता सिद्ध करण्याची जबाबदारी साखर उद्योगावर आहे. इतरांच्या तुलनेत हा उद्योग आदर्शवत कसा असेल याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे.''

श्री. चव्हाण म्हणाले, ""पश्‍चिम महाराष्ट्र वगळता राज्यातील काही जिल्ह्यांत दुष्काळी परिस्थिती आहे. त्या ठिकाणी पैसेवारी देखील कमी आहे. तेथे शासनाकडून तातडीने मदत पोचवण्यात येईल.''

बंद पडलेल्या सहकारी साखर कारखान्यांसंदर्भात तातडीने निर्णय घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी या वेळी सहकारमंत्र्यांना केली. अवसायनातील कारखाने प्राधान्याने सहकाराकडे व नंतर खासगी कारखान्यांकडे चालवायला देऊन संबंधित परिसरातील ऊस लागवडीला उत्तेजन देण्याची आवश्‍यकता आहे. उभारणीतील अपूर्ण कारखानेदेखील तातडीने पूर्णत्वास नेण्यात येतील, सहवीज निर्मितीच्या धोरणातील सध्याच्या त्रुटी दूर करून वीजदराचे नवे धोरण जाहीर करू, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

सहकार खात्यांतर्गत राजकारण करण्याऱ्या अधिकाऱ्यांना तंबी देऊन मुख्यमंत्री म्हणाले, ""कामकाजाची पद्धत सुधारावी. पारदर्शी व लोकाभिमुख निर्णय घेण्यात यावेत. अधिकाऱ्यांनी राजकारण करत बसू नये. चुकले तर सुधारण्याची संधी मिळेल. सहकारमंत्र्यांनी यामध्ये अधिक लक्ष घालावे.''

थकीत अनुदान महिन्यात अदा करणार ः सहकारमंत्री
साखर उद्योगासाठी राज्याकडून देण्यात येणाऱ्या विविध अनुदानांतील 240 कोटी रुपयांच्या मागण्या हिवाळी अधिवेशनात मंजूर झाल्या आहेत. महिनाभरात संबंधित साखर कारखान्यांना निधीचे वितरण करण्यात येईल, असे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

ते म्हणाले, ""साखर धंद्याच्या अडचणींसंदर्भात येत्या 12 रोजी सर्व कारखानदारांची पुण्यात बैठक घेतली जाईल. त्यानंतर थकहमी व साखर कारखान्यांच्या वर्गीकरणासह सुधारित धोरण जाहीर केले जाईल.''
शासनाची थकहमी घेऊन सहा साखर कारखान्यांनी एक कणही साखर उत्पादित केली नाही, या कारखान्यांबाबत खोटा अहवाल देणाऱ्या साखर आयुक्तालयातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे श्री. पाटील म्हणाले.
यंदा साखर उत्पादनात 40 टक्के घट असल्याचे सांगून उसाच्या अनुपलब्धतेमुळे फेब्रुवारी मध्यापर्यंत 110 कारखाने बंद होणार आहेत. मार्च मध्यापर्यंत गाळप हंगाम संपेल, असे श्री. पाटील यांनी सांगितले.

जलसंपदामंत्री अजितदादा पवार म्हणाले, ""यंदापेक्षा पुढील वर्ष साखर उद्योगासाठी बिकट आहे. उसाच्या वाढीव दराने शेतकऱ्यांचा फायदा होईल. वाढत्या खर्चाने कारखाने मात्र अडचणीत येतील. राज्य सरकार व केंद्र सरकारने नेहमीच साखर उद्योगाच्या हिताचे निर्णय घेतले आहे. राज्य सरकारातील मंत्र्यांचे कारखाने सुरळीत सुरू आहेत. बंद पडलेल्या कारखान्यांना सहकारातील अपप्रवृत्ती कारणीभूत आहेत. अशा लोकांनी सुधारावे, अन्यथा घरी बसावे, असा सल्ला श्री. पवार यांनी दिला.
---
चंद्रशेखर घुले साखर संघाचे नवे अध्यक्ष
मोहिते, तिडके उपाध्यक्ष
राज्य सहकारी साखर संघाच्या 52 व्या सर्वसाधारण सभेत संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांनी चंद्रशेखर घुले यांचे नाव सुचवले. उपाध्यक्षपदी इंद्रजित मोहिते व गणपत तिडके यांची नावे सुचविण्यात आली. नव्या अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या नावाला सभेने एकमताने मंजुरी दिली. राज्य साखर संघाचे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्याकडून चंद्रशेखर घुले लवकरच सूत्रे स्वीकारतील.

No comments: