Thursday, January 8, 2009

दूध खरेदीदरात 15 पैशांची घट

दूध खरेदीदरात 15 पैशांची घट

- दुग्ध व्यवसाय आयुक्त श्रीनिवासन

मुंबई (प्रतिनिधी) ः राज्यातील दुधाच्या अतिरिक्त उत्पादनामुळे दुधाच्या सर्वसाधारण दरात कोणतेही बदल न करता 3.5 फॅटच्या पुढे प्रति पॉइंट 30 पैशांऐवजी 15 पैसेच देण्यात येतील, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

अतिरिक्त दुधाच्या विक्रीसाठी देशभर प्रयत्न करण्यात येत असून युद्धपातळीवर दूध भुकटी निर्मितीला प्राधान्य देण्यात येत असल्याचे राज्याचे दुग्ध व्यवसाय आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी "ऍग्रोवन'ला सांगितले.

राज्यातील अतिरिक्त दुधाच्या पार्श्‍वभूमीवर अडचणीत आलेल्या दुग्ध व्यवसायासंबंधी सद्यःस्थितीवर बोलताना एस. व्ही. आर. श्रीनिवास म्हणाले, ""सध्या पुष्ठकाळ सुरू असल्याने दुधाचे मुबलक उत्पादन होत आहे, 3.5 फॅटच्या एक लिटर दुधाला रु. 10.50 इतका दर आहे. त्यापुढे प्रति पॉइंट पूर्वी 30 पैसे दर दिला होता त्यामध्ये 15 पैशांची घट करण्यात आली आहे.''
अतिरिक्त दुधाच्या विक्रीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगून देशभर शक्‍य तेथे दूधविक्री करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
श्रीनिवासन म्हणाले, ""केरळमध्ये सध्या रोज एक लाख लिटर दूध पाठविले जाते. आंध्र प्रदेश सरकारबरोबर देखील करार करण्यात येत आहे, इतर राज्यांशीदेखील बोलणी सुरू आहेत.''

सहकारी दूध संघांना जास्तीत जास्त दुधाची भुकटी निर्माण करण्यासाठी प्रवृत्त करण्यात येत आहे, राज्याबाहेर दूध विक्रीमधील तोटा सरकार सहन करेल, मात्र कोणत्याही परिस्थितीत दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही, असे देखील श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले.

No comments: